8 November 2026News Website

गणेशोत्सवात सामाजिक जनजागृतीला प्राधान्य; चंद्रपूर पोलिसांकडून गणेश मंडळांसाठी आकर्षक स्पर्धेची घोषणा.

” पदार्थविरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, महिला सुरक्षा आणि नियमपालनावर भर; प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारांनी होणार गौरव”

चंद्रपूर :-यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, तसेच समाजातील ज्वलंत विषयांवर प्रभावी जनजागृती व्हावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष जनजागृती स्पर्धेची घोषणा केली आहे. अमली पदार्थविरोधी अभियान, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, महिला सुरक्षा आणि शांतता व नियमांचे पालन या विषयांवर उत्कृष्ट देखावे, जिवंत झांकी, रांगोळी किंवा जनजागृतीपर उपक्रम सादर करणाऱ्या मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.



पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे उत्सवाचे पावित्र्य जपत तरुण पिढीला योग्य दिशा देणे, सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणे आणि गणेशोत्सवाला समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ बनविणे.

💥 स्पर्धेतील प्रमुख विषय 💥

👉  अमली पदार्थविरोधी जनजागृती (Anti-Drugs Campaign): व्यसनमुक्ती, ड्रग्जचे दुष्परिणाम आणि नशामुक्त समाजाचा संदेश देणारे देखावे किंवा उपक्रम.

👉  ध्वनी प्रदूषण नियंत्रण: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून नो डीजे, पर्यावरणपूरक उत्सव आणि पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन.

👉  महिला सुरक्षा व सक्षमीकरण: छेडछाडविरोधी संदेश, सायबर सुरक्षा, महिलांवरील अत्याचार प्रतिबंध आणि सक्षमीकरणावर आधारित सादरीकरण.

👉  शांतता व नियमांचे पालन: मंडप परिसर, मिरवणुका आणि आरतीदरम्यान पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन.

💥 सर्वोत्कृष्ट मंडळांचा गौरव💥

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तीन गणेश मंडळांची निवड पोलिस प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत केली जाणार आहे. विजेत्या मंडळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.

💥 सहभागी होण्यासाठी आवाहन 💥

सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक प्रबोधनाला चालना देणारे उपक्रम राबवून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी केले आहे.

💥  प्रवेशिका पाठविण्यासाठी 💥

👉  ई-मेल: `spchandrapur123@gmail.com`

👉  WhatsApp: 74477440100

गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश घराघरात पोहोचविण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे यंदाचा उत्सव अधिक जबाबदार, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीप्रधान ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अभिषेक किशोर भागडे