7 November 2026News Website

विद्यार्थ्यांचा असाही प्रामाणिकपणा: वरोरच्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली अचूक सचोटी!

वरोरा, ३० ऑक्टोबर :- लोभ आणि पैशाच्या मोहात पडणाऱ्या आजच्या काळात, वरोरा येथील लोकमान्य विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा एक उत्तम व आदर्श धडा घालून दिला आहे. आठवीत शिकणाऱ्या आयुष राऊत आणि मानव एकरे या दोन चिमुकल्यांनी सापडलेली ५०० रुपयांची नोट न स्वतःकडे ठेवता थेट शाळेच्या उपमुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली. या त्यांच्या कृतीने संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

🙏 काय घडली नेमकी घटना 🙏

शाळा सुटल्यानंतर आयुष आणि मानव नेहमीप्रमाणे आपापल्या घरी परतत होते. वाटेत त्यांना रस्त्यावर ५०० रुपयांची नोट पडलेली दिसली. अनेक जण सापडलेली रक्कम स्वतःच्या खिशात घालतात; पण या दोन्ही विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, कसलाही मोह न बाळगता तो प्रामाणिकपणा कायम राखला. त्यांनी ती नोट न जुमानता थेट शाळा गाठली आणि उपमुख्याध्यापक दीपक नवले यांच्या हातात ती सचोटीनं सुपूर्द केली.

🙏 शाळेत जोरदार सत्कार 🙏

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच नैतिक मूल्ये रुजावीत आणि इतर मुलांनीही यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने शुक्रवारी शाळेच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहुल राखे आणि उपमुख्याध्यापक दीपक नवले यांच्या हस्ते आयुष राऊत व मानव एकरे या दोन्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

“केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालत नाही, तर मुलांमध्ये सामाजिक जाणीव, प्रामाणिकपणा आणि उच्च नैतिक मूल्ये रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून हेच सिद्ध करून दाखवले आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्याध्यापक दीपक नवले यांनी काढले.

मुख्याध्यापक राहुल राखे यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकीची थाप देत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. या दोन चिमुकल्यांच्या प्रामाणिकपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वरोरा शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

अभिषेक किशोर भागडे