नागपूर / चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हाय व्होल्टेज राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे! नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.) यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक आदेश पारित करत श्री. सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची गटनेतेपदाची नोंदणी रद्दबातत ठरवली आहे. त्याचसोबत श्री. राजेश मुरली अडूर यांची पुन्हा एकदा काँग्रेसच्या अधिकृत गटनेतेपदी निवड करून त्यांच्या नावाची नोंदणी अभिलेखावर घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दणक्यानंतर विभागीय आयुक्तांनी हा मोठा निर्णय दिला आहे.
💥 काय आहे संपूर्ण राजकीय घटनाक्रम ? (सुरुवातीपासून शेवटपर्यंत)
- निवडणूक आणि पहिली नोंदणी (१६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६) :- १५ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले. या २७ सदस्यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्तांकडे वैयक्तिक माहिती सादर करून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चंद्रपूर शहर महानगरपालिका गट’ म्हणून अधिकृत नोंदणी केली आणि सर्वानुमते राजेश मुरली अडूर यांची गटनेतेपदी निवड केली.
- पहिला सत्तापालट आणि न्यायालयीन लढाई (जून ते जुलै २०२६) :- १६ जून २०२६ रोजी श्रीमती संगीता मंगल भोयर यांच्यासह १६ सदस्यांनी अचानक बंड पुकारले. त्यांनी अडूर यांना हटवून सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांच्या नावाची शिफारस केली. त्यानुसार २१ जुलै २०२६ (पत्र क्र. ३७७/२०२६) रोजी विभागीय आयुक्तांनी अडबाले यांच्या गटनेतेपदाची नोंद केली. या निर्णयाला राजेश अडूर यांनी उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथे (याचिका क्र. ५७७३/२०२६) आव्हान दिले.
- अडूर यांचा पुन्हा जोरदार पलटवार (सप्टेंबर २०२६) :- राजेश अडूर यांनी हार न मानता पक्षांतर्गत मोर्चेबांधणी केली. २८ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी काँग्रेस गटाची विशेष बैठक बोलावली. यात २७ पैकी १५ सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरेंद्र अडबाले यांना हटवून पुन्हा राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड करण्याचा आणि गटाच्या उपविधीत बदल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. २९ सप्टेंबर २०२६ रोजी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
- प्रत्यक्ष सुनावणी आणि हायकोर्टाचा दणका (ऑक्टोबर २०२६):
- ७ ऑक्टोबर २०२६ :- विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्ष सुनावणी झाली. अडूर यांच्यासह सर्व १५ नगरसेवकांनी वैयक्तिकरीत्या हजर राहून आपण अडूर यांच्याच बाजूने असल्याचा आणि ठरावावर स्वतःच स्वाक्षऱ्या केल्याचा प्रत्यक्ष कबूलनामा दिला.
- ३० ऑक्टोबर २०२६ :- दरम्यानच्या काळात या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून अडूर यांनी उच्च न्यायालयात दुसरी याचिका (क्र. ९३६५/२०२६) दाखल केली. ३० ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना अडूर यांच्या प्रस्तावावर त्वरित कायदेशीर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
⚖️ विभागीय आयुक्तांचे निरिक्षण आणि अंतिम ‘सुप्रीम’ आदेश!
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सुनील हरीभाऊ काळे विरुद्ध अविनाश गुलाब मार्डीकर व इतर’ (Civil Appeal No. 2080/2015) या ऐतिहासिक निकालाचा दाखला देत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्पष्ट केले की:
“लोकशाही मार्गाने नगरपरिषद/महानगरपालिका पक्षाला आपला गटनेता बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. २७ पैकी १५ सदस्यांचे स्पष्ट बहुमत राजेश मुरली अडूर यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे २१ जुलै २०२६ चा सुरेंद्र अडबाले यांचा नोंदणी आदेश तत्काळ रद्दबातत करण्यात येत असून, श्री. राजेश मुरली अडूर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मनपा पक्ष/गटनेतेपदी अधिकृत नोंदणी करण्यात येत आहे.”
📜 प्रशासकीय हालचालींना वेग!
या आदेशानंतर नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभागाचे विभागीय सह आयुक्त रविंद्र भेलाई यांनी (पत्र क्र. एमयुएन/१९(४)/कावि-५८७/२०२६, दि. ०५/११/२०२६) मनपा आयुक्तांना तातडीचे निर्देश दिले आहेत. सदर आदेशाची प्रत चंद्रपूरच्या मा. महापौर, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि संबंधितांना खास दूतामार्फत (Special Messenger) पोहोचवून, पोचपावतीवर नाव, दिनांक व स्वाक्षरी घेऊन तात्काळ नागपूर कार्यालयात सादर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.
प्रतिलिपि पाठवण्यात आलेले मुख्य अधिकारी/पदाधिकारी :- १. अपर मुख्य सचिव (नगर विकास विभाग-२), मंत्रालय, मुंबई २. मा. महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका ३. जिल्हाधिकारी, चंद्रपूर ४. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका ५. श्री. राजेश मुरली अडूर (अधिकृत गटनेते) ६. श्री. सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले ७. शासकीय अधिवक्ता, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ
राजकीय वर्तुळात खळबळ :- न्यायालयीन आणि प्रशासकीय लढाईत अखेर बहुमताच्या बळावर राजेश अडूर यांनी बाजी मारल्यामुळे अडबाले गटाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा पूर्णपणे बदलली आहेत!





