चंद्रपूर, दि. 07 :- संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पशुधन जिवंत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आतापासून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर लोकसहभागातून या परिस्थितीवर आपण निश्चित मात करू, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
भद्रावती तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील तलावामध्ये शुक्रवारी मका चाऱ्याची लागवड करून जिल्हास्तरीय चारा लागवड उपक्रमाचा शुभारंभ करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी वरोराचे आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदी उपस्थित होते.
आष्टी (काकडे) या गावातून चारा लागवडीचा शुभारंभ होत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्ह्यातील पाच माजी मालगुजारी (मामा) आणि लघु पाटबंधारे (लपा) तलावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून चारा लागवड करून बचत गटाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. चारा लागवडीच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात इतरही ठिकाणी चारा लागवड उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम आमच्या पशुधनासाठी आहे, असे गावातील प्रत्येकाला वाटले पाहिजे.
लोकसहभागातूनच चळवळ निर्माण होते. आज तुमच्या गावात चारा लागवडीचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री, आमदार, कलेक्टर, सीईओ हे सर्व आले आहेत. चारा लागवड हा केवळ एक शब्द नाही. तर त्याचे महत्त्व फार मोठे आहे. लोकांनी त्याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनाचे, आपल्या गावाचे अनुकरण इतर गावांनी केले पाहिजे. महिलांनी पुढाकार घेतला तर निश्चितच परिवर्तन होते. आपला जिल्हा महाराष्ट्रात चारा लागवड आणि पाणी व्यवस्थापनात अग्रेसर असावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
यावेळी आमदार करण देवतळे म्हणाले, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये पाणी व चारा टंचाईचे नियोजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दुष्काळ परिस्थितीमध्ये चारा व पाणी टंचाईवर आपण निश्चितच मात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुहास रोडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते, डॉ.प्रमोद जल्लेवार यांनी, निकृष्ट चारा सकस करणे, मुरघास, अझोला प्रात्यक्षिकासह चारा साक्षरता अभियान व संवर्धन योजनेची माहिती दिली. यावेळी नागरिकांना मोफत वैरण बियाणे, ठोंब्याचे वाटप करण्यात आले. मका वैरण बियाण्याची पेरणी करून पालकमंत्र्यांच्या हस्ते चारा लागवडीचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी तर आभार डाॅ.सतीश अगडते यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, प्रभाग संघाच्या महिला व इतर नागरिक उपस्थित होते.





