Home Breaking News अल्पवयीनेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सश्रम कैद.रामनगर पोलिसांचा भक्कम तपास;...

अल्पवयीनेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सश्रम कैद.रामनगर पोलिसांचा भक्कम तपास; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

चंद्रपूर :- अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात रामनगर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे आरोपीला अखेर न्यायालयाने १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर संदेश मिळाला आहे.



ही घटना ३ जून २०२२ रोजी घडली होती. फिर्यादी व त्यांची पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. शोध घेत असताना आरोपीच्या घराजवळ मुलीचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता आरोपी अल्पवयीन मुलीवर घरातील पलंगावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले.



याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६११/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेचे कलम ३७६(एबी), ५०६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.



जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झालेल्या सुनावणीत सरकारी अभियोक्ता अॅड. एस. आर. डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांची सश्रम कैद, ५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.



या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर यांनी केला. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि शामराव पोईनकरे तसेच दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.