Home Breaking News वरोरा सजले कुस्ती आणि आता तायक्वांदोसाठी! संस्कार भारतीमध्ये रंगणार सीबीएसई साऊथ झोन-II...

वरोरा सजले कुस्ती आणि आता तायक्वांदोसाठी! संस्कार भारतीमध्ये रंगणार सीबीएसई साऊथ झोन-II तायक्वांदो महासंग्राम

वरोरा :- महाराष्ट्राचे क्रीडा हब म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या वरोरा नगरीत आता पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल च्या मैदानावर आगामी २१ ते २४ जून २०२६दरम्यान ‘सीबीएसई साऊथ झोन-II तायक्वांदो स्पर्धा २०२६’ या भव्य राष्ट्रीय क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१२०० पेक्षा जास्त खेळाडूंचे वरोरामध्ये आगमन!
या चार दिवसीय महाकुंभात सीबीएसई पुणे (महाराष्ट्र), बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम या तीन मोठ्या विभागांतील शाळांचे खेळाडू आपापले कौशल्य पणाला लावणार आहेत. अंडर-१४, अंडर-१७ आणि अंडर-१९ अशा विविध वयोगटांत सुमारे  १००० ते १२०० प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आपल्या चपळाईने आणि वेगवान हालचालींनी हे खेळाडू मॅटवर थरार निर्माण करणार आहेत.
भव्य उद्घाटन सोहळा – २२ जून!
स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन २२ जून २०२६ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात पार पडणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि पालकांची उपस्थिती राहणार आहे. तायक्वांदोच्या खेळातील शिस्त आणि आक्रमकतेचा प्रत्यय या उद्घाटन समारंभात उपस्थितांना घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ
केवळ एक स्पर्धा म्हणून न पाहता, ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील क्रीडाभावना आणि जिद्द जागृत करणारी ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठीत स्पर्धेमुळे वरोराच्या मातीत घडणाऱ्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
संस्कार भारती पब्लिक स्कूलची तयारी पूर्ण!
आगामी चार दिवस वरोरा केवळ शिक्षणाचे नव्हे, तर खेळाच्या मैदानावरील आक्रमकतेचे केंद्र बनणार आहे. या तायक्वांदो महासंग्रामात कोण मारणार बाजी? कोण उंचावणार विजयाची पताका? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.