Home Breaking News भद्रावतीकरांच्या आरोग्याशी खेळ; शहरात दूषित पाणीपुरवठा, विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

भद्रावतीकरांच्या आरोग्याशी खेळ; शहरात दूषित पाणीपुरवठा, विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

भद्रावती :- शहरातील विविध प्रभागांमध्ये गेल्या ८ ते १० दिवसांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नळाद्वारे पिवळसर रंगाचे, तसेच रॉकेल, डिझेल आणि सडल्यासारखा वास येणारे पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रभागांमध्ये पाणी पिण्यायोग्य नाही
प्रभाग क्रमांक १२ मधील गुंडावार प्लॉट येथील नागरिकांनी काँग्रेस नगरसेवक सुनील नामोजवार व अनिल पडोळे यांच्याकडे या बाबत तक्रार केली होती. नगरसेवकांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, नळाला येणारे पाणी पिवळसर असून त्याला उग्र दुर्गंधी येत असल्याचे समोर आले. केवळ याच भागात नव्हे, तर गौतम नगर, गुरूनगर, पंचशील वार्ड, गवराला, शिवाजी नगर, हनुमान नगर, विंजासन, मंजुषा लेआउट, श्री नगर आणि विश्वकर्मा नगर यांसह शहरातील इतर भागातही असाच दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आरोग्याचा धोका, प्रशासनाचा निष्काळजीपणा
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरात नागरिक आजाराच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, “२४ तास शुद्ध पाणीपुरवठा” करण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी पदाधिकारी मात्र सहलीत मग्न असल्याची टीका विरोधी नगरसेवकांनी केली आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी मागणी केली आहे की, तत्काळ पाणीपुरवठा यंत्रणेची चौकशी करून पाईपलाईन दुरुस्ती किंवा इतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना त्वरित शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करावा. जर या गंभीर बाबीची तातडीने दखल घेतली गेली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार, काँग्रेसच्या गटनेत्या सौ. सरिता सूर, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका सौ. कल्पना भुसारी, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सौ. उरविला साव, नगरसेविका सौ. उषा जाधव, सौ. पल्लवी तामगडे व नगरसेवक प्रथम गेडाम आदी उपस्थित होते.