चंद्रपूर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), चंद्रपूरच्या पथकाने वरोरा तालुक्यात मोठी कारवाई करत भ्रष्ट अधिकारीरूपी मुसक्या आवळल्या आहेत. शेतात बार अँड रेस्टॉरंट सुरू करण्याच्या बांधकाम परवानगीसाठी आणि ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल ५,००,००० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
श्री. पांडुरंग निलकंठ पेंदे (वय ४८, पद- ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय नागरी, ता. वरोरा) आणि श्री. प्रणव सुधाकर बक्षी (वय ५१, पद- विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती वरोरा) अशी जाळ्यात अडकलेल्या दोन्ही भ्रष्ट आरोपींची नावे आहेत.
💥 काय आहे नेमके प्रकरण 💥
तक्रारदार (वय ३७ वर्ष) आणि त्यांच्या भावाच्या नावे असलेल्या शेतात बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीबाबत ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. या कायदेशीर कागदपत्रासाठी आरोपी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे याने स्वतःकरिता आणि आपले वरीष्ठ विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यांच्याकरिता ५,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालय गाठून दिनांक ०२/११/२०२६ रोजी लेखी तक्रार नोंदवली.
पडताळणीत बिंग फुटले
- दिनांक ०४/११/२०२६ रोजी वरोरा येथील आनंदवन चौक येथे पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत, आरोपी पांडुरंग पेंदे याने ५ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३,००,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
- दिनांक ०५/११/२०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, वरोरा येथे पुन्हा पडताळणी केली असता, आरोपी पांडुरंग पेंदे व विस्तार अधिकारी प्रणव बक्षी या दोघांनी मिळून तडजोडीअंती ३,००,००० रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
💥 सापळा रचून आवळल्या मुसक्या 💥
दिनांक ०६/११/२०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. मौजा खांबाळा येथे आरोपी पांडुरंग पेंदे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याने पंचासमक्ष त्याला आणि त्याचे वरिष्ठ आरोपी प्रणव बक्षी यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर अटकेची कारवाई केली जात आहे.
नागरिकांसाठी एसीबीचे आवाहन: भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणतीही लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.
- दुरध्वनी क्रमांक: 07172-250251, 1064
- व्हॉट्सअॅप क्रमांक: 8379951064, 9067671064





