वरोरा :- वरोरा तालुक्यातील एकार्जुना गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. मृताची ओळख नितीन चंद्रशेखर डुडुरे (वय ४०, रा. एकार्जुना) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन डुडुरे हे दुपारी शेतीची कामे करण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, सायंकाळी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी नितीन यांनी एका झाडाचा आधार घेतला, मात्र त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. यातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एकार्जुना गावात शोककळा पसरली आहे.




