वरोरा :-भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘एसआयआर’ सर्वेक्षण प्रक्रियेत गंभीर दिरंगाई आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वरोरा येथील दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेवर नायब तहसिलदार, निवडणुक तहसिल कार्यालय वरोरा यांचे तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी (दि. 21/05/2026 रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न झाल्याने ही कारवाई केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कारवाईने शासकीय केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही सुरेश जनार्दन मसराम, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्र क्र. 167- वरोरा यांचे काम केवळ 35 टक्क्यांवरच रेंगाळले होते. तसेच मोरेश्वर लक्ष्मण सातपूते, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्र क्र. 188- वरोरा यांचे काम 31 टक्क्यांवरच रेंगाळले होते.
सुरेश जनार्दन मसराम हे हिरालाल लोया विदयालय वरोरा,येथे सहाय्यक शिक्षक, म्हणून तर मोरेश्वर लक्ष्लम सातपूते हे नगर परिषद वरोरा येथे लिपीक म्हणुन कार्यरत आहेत. शासनाच्या सुरु असलेल्या ‘एसआयआर’ सर्वेक्षणासाठी त्यांची ‘बीएलओ’ (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सर्वेक्षणाचे काम अचूक आणि ठराविक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वेळेत पूर्ण करण्याची नोटिसा देऊनही दुर्लक्ष दिरंगाईबाबत प्रशासनाकडून यांना तीन वेळा ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात कामात कोणतीही प्रगती दिसली नाही. अखेर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी दिनांक 18.05.2026 रोजी आढावा सभा घेतली असता सदर सभेत दोनही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अनुपस्थित होते.
सदर मॅपिंगचे कामात मतदान केंद्रस्तरीय अधिकरी यांना वारंवार सुचना / निर्देश देवुनही मतदान केंद्र क्र. 167 व 188 यांचे कामात कोणतीही प्रगती दिसुन आली नाही. तेव्हा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे आदेशानुसार शरद मसराम, नायब तहसिलदार (निवडणुक) तहसिल कार्यालय वरोरा यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




