चंद्रपूर :- वरोरा येथील बस स्टॅंडजवळ, ट्रमा केअर युनिटच्या बाजूला असलेल्या ‘मनोज चिवडा’ (मे. मनोज रमेश करलुके ) या दुकानातून कच्चा चिवडा किंवा अन्य अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे संशयित अन्न विषबाधेची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गंभीर दखल घेतली असून, वरोरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
💥 पत्रातील ठळक मुद्दे 💥
- घटनेचे गांभीर्य :- दिनांक २८/०९/२०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, या दुकानामधील अन्नपदार्थांमुळे नागरिकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
- पोलिसांकडून मागवलेली सविस्तर माहिती:
- अन्न विषबाधा झाल्याचा दिनांक, वेळ व ठिकाण.
- बाधित रुग्णांची नावे, वय व पत्ता.
- पोलीस स्टेशन डायरी क्रमांक व नोंद.
- दोषींविरुद्ध दाखल गुन्ह्याचा क्रमांक व दिनांक.
- अन्न पदार्थांचे तसेच रुग्णांच्या (उलट्या, जुलाबाचे) नमुन्यांचा तपशील.
- घेतलेल्या जबावांच्या छायांकित प्रती आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल.
अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर) यांनी या प्रकरणात कोणतीही कुचराई न करता सर्व कागदपत्रे व माहिती त्वरीत कार्यालयास पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या घृणास्पद प्रकारामुळे वरोरा परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर प्रशासनाने कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





