6 November 2026News Website

दहेगाव ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम: वेळेत घरटॅक्स भरणाऱ्या नागरिकांना १५० रुपयांत ५ किलो साखर वाटप!

दहेगाव :-‘घरटॅक्स भरूया, गाव स्वच्छ व सुंदर करूया’ असा संकल्प करत दहेगाव ग्रामपंचायतीने दिवाळीच्या मुहूर्तावर एका आगळ्यावेगळ्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा संपूर्ण गृहकर वेळेत भरणाऱ्या खातेदारांसाठी “१५० रुपयांत ५ किलो साखर” या योजनेचा दणक्यात शुभारंभ आज (दि. ६ नोव्हेंबर २०२६) धनत्रयोदशीच्या शुभ दिनी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.

या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहेगावचे सरपंच श्री. विशाल नानाजी पारखी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सौ. गायत्री विजय मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी श्री. राजेश झीजराम राठोड आणि माजी सरपंच श्री. महेश विश्वनाथ सोनटक्के उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि थोर पुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विकासाला आणि लोकसहभागाला प्रोत्साहन

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सरपंच विशाल पारखी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला. वेळेत कर भरून गावच्या प्रगतीत हातभार लावणारे नागरिक हेच खऱ्या अर्थाने गावाचे शिलेदार आहेत, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी श्री. राजेश राठोड यांनी योजनेच्या अटी व स्वरूपाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

पहिल्याच दिवशी नागरिकांचा तुफान प्रतिसाद

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहेगावच्या नागरिकांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त गर्दी केली होती. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात गावातील जागरूक लाभार्थी श्री. फागोजी दरेकर, सौ. बेबी मनोहर धाबेकर, श्री. गणपत राजूरकर, श्री. रवींद्र दरेकर, श्री. हरिदास डाहुले आणि श्री. राजेंद्र किन्नाके यांना मान्यवरांच्या हस्ते साखरेचे वितरण करून योजनेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. विशाल पंढरी डाहुले, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विठ्ठलजी बोधाने, दहेगाव सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गजानन देवाजी माहुरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. सरपंचांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दहेगाव वाशियांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली असून, गावकऱ्यांमधून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.

 

अभिषेक किशोर भागडे