6 November 2026News Website

‘अड्याळ टेकडीवरील विपश्यना केंद्र देशासाठी आकर्षणाचे केंद्र बनविणार’ आमदार विजय वडेट्टीवार

  • थायलंडच्या ११० बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत अड्याळ टेकडीवर भव्य धम्म सोहळा संपन्न
  • बौद्ध भिक्खूंच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडीवरील निर्माणाधीन विपश्यना केंद्र इतके भव्य, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बनविणार की, देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी ते पाहण्यासाठी ब्रम्हपुरीत आले पाहिजे, असा ठाम संकल्प विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. हे केंद्र केवळ ध्यानधारणेपुरते मर्यादित न राहता बुद्धविचार, शांती आणि करुणेचा संदेश देणारे देशपातळीवरील महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



अड्याळ टेकडी येथे थायलंडमधील ११० बौद्ध भिक्खूंच्या विशेष उपस्थितीत भव्य धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने आमदार वडेट्टीवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून बौद्ध भिक्खूंचे स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त केले.

थायलंडच्या ११० भिक्खूंची उपस्थिती भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा, मैत्री आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात थायलंडमधील पूजनीय फ्रा अजह्न जारण, फ्रा महा चेतसादा आणि फ्रा अजह्न विचाई यांच्यासह ११० बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते. त्यांच्या पवित्र उपस्थितीत धम्मदेसना, सुत्त पठण, मैत्री संदेश आणि शांती प्रार्थना पार पडली.

परिसरात वृक्षारोपण या सोहळ्याचे औचित्य साधून उपस्थित बौद्ध भिक्खूंच्या हस्ते विपश्यना केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून निसर्ग संवर्धनासोबतच बुद्धांच्या मैत्री व करुणेच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.

अड्याळ टेकडीवरील विपश्यना केंद्राची उभारणी अत्यंत दर्जेदार आणि आकर्षक स्वरूपात करून त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. या धम्म सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

अभिषेक किशोर भागडे