वरोरा :- शहरातील नेहरु चौक परिसरात जुन्या वादातून दोन आरोपींनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मोहन मुरलीधर दाते.वय 27 रा. करंजी हा युवक गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी वरोरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न (कलम 109/1) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी सुरज बालाजी गोहने आणि अटक झालेला आरोपी सादिक शेख हे दोघे आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी मोहन दाते यांच्या मोबाईल शॉपीमध्ये अचानक शिरले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी मोहनसोबत वाद घातला. वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी धारदार चाकूने मोहनवर सपासप वार केले.
💠 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल 💠
या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मोहनला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. फिर्यादीच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी सुरज गोहने आणि सादिक शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम (109/1) (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे पथक करत आहे. भरदिवसा घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




