वरोरा :- लोक शिक्षण संस्था संचलित येथील लोकमान्य इंग्रजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. इयत्ता आठवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा विद्यार्थी चि. अवधूत उमेश लाभे याने घवघवीत यश संपादन करत, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम स्थान पटकावले आहे. अवधूतच्या या यशाने वरोरा शहरासह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
💠 यशाची परंपरा आणि कौटुंबिक वारसा 💠
अवधूतचे हे यश केवळ एक आकडा नसून, एका जिद्दी प्रवासाचे फळ आहे. विशेष म्हणजे, अवधूतची बहीण कु. मृणाल लाभे हिने देखील यापूर्वी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता. बहिणीचे सातत्यपूर्ण यशच आपल्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरल्याचे अवधूतने सांगितले. आपल्या या यशाचे श्रेय त्याने आपली आई सौ. मंजिरी लाभे, वडील, बहीण मृणाल आणि शाळेतील गुरुजनांना दिले आहे.
💠 संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव 💠
अवधूतच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील , कार्यवाह श्री. विश्वनाथ जोशी व ॲड. दुष्यंत देशपांडे , उपाध्यक्ष श्री. विकासजी घुडे , संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय आंबुलकर यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाले असून, अवधूतचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाने लोकमान्य इंग्रजी विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.




