वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, वरोरा येथे रविवार विशेष उपक्रमांतर्गत अधिकारी भेट व प्रेरणादायी मार्गदर्श कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना अनुभवी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, वेळेचे प्रभावी नियोजन, आत्मविश्वासाची जडणघडण, शिस्तीचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद भस्मे म्हणाले, ध्येय निश्चित करा, त्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घ्या आणि सातत्य कधीही सोडू नका. ध्येय, शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.”त्यांनी पोलीस सेवेत काम करताना आलेले विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत संकटांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा दिली. शरद भस्मे यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर व मार्गदर्शक उत्तर देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे वातावरण दिसून आले.
लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्राच्या माध्यमातून झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकारी, तज्ज्ञ आणि मान्यवरांचे नियमित मार्गदर्शन दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य दिशा मिळत असून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अभ्यास केंद्राशी संलग्न स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थित विद्यार्थ्यांनी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त करत भविष्यातही अशा मार्गदर्शनपर सत्रांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.




