7 November 2026News Website

गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर पडोली पोलिसांचा धडाका!

आयशर ट्रकचा थरारक पाठलाग; २८ गोवंशीय जनावरांची सुटका, आरोपी जेरबंद

चंद्रपूर | प्रतिनिधी :- गोवंशाची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर पडोली पोलिसांनी धाडसी कारवाई करत २८ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ट्रक, जनावरे व मोबाईल असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पडोली चौकासमोर नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरकडून इरई नदी मार्गे येणाऱ्या MH-28-BB-4970 क्रमांकाच्या सहा चाकी आयशर ट्रकवर पोलिसांची नजर पडली. लाल रंगाच्या या ट्रकवर निळ्या रंगाची ताडपत्री झाकण्यात आली होती. पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन थांबविण्याऐवजी पेट्रोल पंपाच्या आवारातून यू-टर्न घेत वेगाने पळ काढला.

यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. वाहन कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा दिशेने पळत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर वरोडा गावाजवळ रस्त्यावर अडथळा निर्माण करून ट्रक थांबविण्यात आला. चालकाने वाहन जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला शेतशिवारातून ताब्यात घेतले.

ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये अमानुषपणे कोंबून भरलेली २८ गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरांसह ट्रक आणि आरोपीला पडोली पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ३१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी अब्दुल हफीज गुफ्रान खान (वय ३३), रा. वॉर्ड क्र. ०४, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर, हा आयशर ट्रक चालक असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

२१.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत २८ जिवंत गोवंशीय जनावरे (बैल व गाय) — ₹१ लाख ८३ हजार, टाटा कंपनीचा सहा चाकी आयशर ट्रक — ₹२० लाख आणि आरोपीच्या ताब्यातील VIVO कंपनीचा मोबाईल — ₹१० हजार, असा एकूण ₹२१ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहाकर कोकोडे, पो.हवा. विनोद वानकर, पो.अं. मिरजकुमार लोही, पो.अं. समीर खाडे, पो.अं. श्रीनिवास वाभीटकर आणि पो.अं. मिरज भोयर यांनी केली.

 

अभिषेक किशोर भागडे