Home विदर्भ जळगावमध्ये वर्धेच्या सुपुत्राचा ऐतिहासिक पराक्रम! ऑक्वाथलाॅन स्पर्धेत अभिनंदन डोणेने पटकावले सुवर्णपदक

जळगावमध्ये वर्धेच्या सुपुत्राचा ऐतिहासिक पराक्रम! ऑक्वाथलाॅन स्पर्धेत अभिनंदन डोणेने पटकावले सुवर्णपदक

वर्धा :-  जळगाव येथे दिनांक २५ व २६ जुलै २०२६ दरम्यान अत्यंत उत्साहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅथलोन व ऑक्वाथलाॅन चॅम्पियनशिप राज्यस्तरीय स्पर्धा २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्याचे नाव सुवर्णक्षरांनी कोरले गेले आहे. या राज्यस्तरीय महासंग्रामध्ये राज्यातील ३०० पेक्षा अधिक हुशार व दिग्गज जलतरणपटूंनी सहभाग नोंदवत आपले कौशल्य पणाला लावले होते. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातून २५ ते ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या राज्यस्तरीय स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील अवघ्या आठ वर्षे वयोगटातील  अभिनंदन आशिष डोणे या होतकरू स्पर्धकाने ॲक्वाथलॉन क्रीडा प्रकारामध्ये अतिशय आक्रमक आणि उल्लेखनीय कामगिरी करत थेट प्रथम स्थान प्राप्त केले. आणि सुवर्णपदकाचा मानकरी ठरत मोठा पराक्रम गाजवला. त्याच्या या ऐतिहासिक आणि शानदार यशाबद्दल त्याला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



या  खेळाडूच्या उज्ज्वल यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी  श्रीमती आशा मेश्राम यांनी अभिनंदनच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. या घवघवीत यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक सांजली वानखेडे व अविनाश सर, त्याचे पालक तसेच त्यांचे प्रेरणास्थान श्री. सुनील उईके यांना देण्यात येत आहे. अभिनंदन डोणेच्या या प्रेरणादायी आणि सुवर्णमय यशामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.