वरोरा :- डॉ . ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वरोरा येथे डॉ . ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन वरोरा च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यात सकाळी डॉ . ए पी जे अब्दुल कलाम चौकात फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर सायंकाळी कॉलरी वॉर्ड वरोरा येथील लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार अभ्यास केंद्रात भेट देत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गो विथ स्ट्रक्चर च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माध्यमांच्या मुलांकरिता मोफत इंग्लिश स्पोकन वर्ग घेऊन विद्यार्थी घडविण्याचे काम करणारे गोपाळ गुडधे यांचा डॉ . ए पी जे अब्दुल कलाम यांचा फोटो देऊन तथा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला .
या प्रसंगी बोलतांना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सभापती नगरपरिषद वरोरा यांनी गोपाळ गुडधे गुरुजी यांच्या कार्याची स्तुती करीत त्यांनी कोरपना तालुक्यातील पारडी , वरोरा तालुक्यातील साखरा व आता चिमूर तालुक्यातील बोथली या जिल्हा परिषद शाळेत गेल्या 15 वर्षांपासून अखंडित गो विथ स्ट्रक्चर च्या माध्यमातून मराठी माध्यमांच्या मुलांच्या मनातून इंग्रजीची भीती घालविण्याचे तसेच त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम केले आहे व अजूनही सुरु आहे . आपल्या हक्काच्या उन्हाळी सुट्या आप्तस्वकियांच्या कार्यक्रमात व स्वतःसाठी न ठेवता त्यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी मार्गी लावल्या आणि तेही निस्वार्थी पणने ते करीत असतात. डॉ . ए पी जे अब्दुल कलामांना अपेक्षित असलेले कार्य गुडधे सर करीत आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले . तसेच वरोरा शहरातील झोपडपट्टी परिसरातील मुलांना दररोज सायंकाळी मोफत इंग्लिश स्पोकनचे धडे देत आहे हे कार्य कौतुकास्पद असून प्रशासनाने या धर्तीवर शहरातील विविध भागात असे उपक्रम राबवावे असे ही ते म्हणाले . या वेळी माजी सभापती प्रमोद वाभिटकर, स्व चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, प्रशांत पिपरे, गुलाब धोबे, आशिष कोरंटलावार, मुकेश मेश्राम यांचीही उपस्थिती होती.




