वणीतील अनधिकृत ‘एस. बी. लॉन व हॉल’चा वापर त्वरित थांबवण्याचे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचे आदेश
सार्वजनिक रस्ता गिळंकृत करून उभारलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडा अन्यथा मनसे शैलीने आंदोलन करण्याचा राजू उंबरकर यांचा कडक इशारा……
वणी (प्रतिनिधी) :- शहरातील मध्यवर्ती भागात सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या अनधिकृत ‘एस. बी. लॉन व हॉल’वर अखेर नगर परिषद प्रशासनाची कुऱ्हाड कोसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि सततच्या पाठपुराव्यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या हॉलचा वापर त्वरित थांबवण्याचे कठोर कायदेशीर आदेश जारी केले आहेत. मनसेच्या या दणक्यानंतर शहरातील भूमाफिया आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठे खळबळ उडाली आहे.
💥 काय आहे संपूर्ण प्रकरण 💥
वणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘एस. बी. लॉन व हॉल’च्या अनधिकृत बांधकामामुळे, ‘फायर एग्झिट’ (अग्निशामक सुरक्षा मार्ग) आणि इतर सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते. तसेच या हॉलमुळे स्थानिक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता.
या गंभीर बाबीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते श्री. राजु उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी नगर परिषद व पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती. प्रशासनाने ८ दिवसांत कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला होता.
नगर परिषद प्रशासनाची कारवाई व कठोर नोटीस
मनसेच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ‘एस. बी. लॉन’चे संचालक श्री. विजय बनवारीलाल अग्रवाल यांना नोटीस बजावली आहे.
- नियमभंग :- लॉन मालकाने मंजूर अभिन्यास नकाशा, बांधकाम परवानगी व मंजूर बांधकाम नकाशा नगर परिषदेकडे सादर केला नाही.
- कायदेशीर कलम :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४४, ५२, ५३, ५४ आणि महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियम कलम १८९ (२) अन्वये कोणतेही अधिकृत परवाने न घेता विकास केल्याचे सिद्ध झाले आहे.
यामुळे सदर जागेवर सुरू असलेला मंगल कार्यालयाचा (हॉल व लॉन) सर्व प्रकारचा वापर त्वरित थांबवण्याचे स्पष्ट आणि कडक निर्देश नगर परिषदेने दिले आहेत.
सार्वजनिक रस्ता मोकळा करण्याची आक्रमक मागणी
केवळ वापर थांबवण्यावरच न थांबता, एस. बी. हॉल व लॉनच्या मालकाने नगर परिषदेचा सार्वजनिक रस्ता गिळंकृत करून उभारलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडून टाकावे आणि तो रस्ता सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी खुला करावा, अशी आक्रमक मागणी मनसेने लावून धरली आहे. नगर परिषदेच्या पुढील प्रत्यक्ष कारवाईकडे आता संपूर्ण वणी शहराचे लक्ष लागले आहे.
“नियम मोडल्यास मनसे शैलीत धडा शिकवू!”
“नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या तसेच अनधिकृतपणे चालणाऱ्या अशा आस्थापनांविरुद्ध मनसेची लढाई यापुढेही अशीच सुरू राहील. नगर परिषदेने वापर थांबवण्याचे आदेश दिल्यानंतरही जर नियमांचे उल्लंघन करून लॉनचा वापर सुरू ठेवल्यास मनसे शैलीने आंदोलन केले जाईल.” राजु उंबरकर (पक्ष नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)





