Home विदर्भ निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ अभियाना दरम्यान मनसेचा वणी आणि अमरावती जिल्ह्यात बैठकांचा धडाका.पदाधिकाऱ्यांनो...

निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ अभियाना दरम्यान मनसेचा वणी आणि अमरावती जिल्ह्यात बैठकांचा धडाका.पदाधिकाऱ्यांनो मरगळ झटकून सज्ज व्हा, मी सदैव पाठीशी उभा – राजू उंबरकर यांचे आवाहन

वणी / मारेगाव :- सध्या केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे राज्यभरात महत्त्वाचे ‘SIR’ (मतदार यादी विशेष पुनरीक्षण) अभियान सुरू आहे. या मोहिमेची पार्श्वभूमी साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांचा पाया रचण्यासाठी बैठकांचा जोरदार झंझावात सुरू केला आहे. मारेगाव, वणी आणि झरी जामणी या तिन्ही तालुक्यांमध्ये राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व बूथ प्रमुखांच्या अत्यंत महत्त्वाच्या आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मार्गदर्शन करताना राजू उंबरकर यांनी कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आव्हान केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकावणारच या उद्देशाने कामाला लागा असे जणू कार्यकर्त्यांकडून ग्वाहीच घेतली आहे. नव्याने येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायतींमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी तुम्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे, अशा शब्दांत मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यकर्त्यांना बळ देताना राजू उंबरकर पुढे म्हणाले, तुम्ही फक्त जनतेच्या प्रश्नांवर मैदानावर उतरून काम करा. निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणतीही अडचण आली, तरी मी तुमच्यासाठी सदैव धावून येईन, असे राजू उंबरकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

राजू उंबरकर यांच्या बैठकांचा हा धडाका केवळ वणी विधानसभा मतदारसंघा पुरता मर्यादित नसून, त्यांनी अमरावती जिल्ह्यातही मनसेच्या पक्ष बांधणीचा वेग वाढवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात त्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठका सुरू आहेत.
पहिला दिवस (अमरावती ग्रामीण) तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट आणि मोरशी या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघांच्या सविस्तर आढावा बैठका घेण्यात आल्या. यामध्ये मतदार नोंदणीचे ‘SIR’ अभियान, नवीन पक्षप्रवेश आणि शाखा बांधणी या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी केले.दुसरा दिवस (अमरावती शहर) दुसऱ्या दिवशी अमरावती शहर म्हणजेच अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठकांचे सत्र पार पडले.
राजू उंबरकर यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे वणी आणि अमरावती परिसरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विदर्भात मनसे अधिक आक्रमकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.