नांदेपेरा ते शेलू रस्ता दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात
वणी (विशेष प्रतिनिधी) :- नांदेपेरा ते शेलू आणि नांदेपेरा ते रांगणा या मुख्य रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था आणि त्यावरील जीवघेणे खड्डे यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व शेलू ग्रामस्थांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनापुढे अखेर प्रशासनाला नतमस्तक व्हावे लागले आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी छेडण्यात आलेल्या या आक्रमक आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचे व नूतनीकरणाचे लेखी आश्वासन दिल्याने मनसे व ग्रामस्थांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
अपघातांचे सत्र आणि नागरिकांचा रोष
नांदेपेरा ते शेलू रस्त्यावर पडलेल्या मोठ्या आणि धोकादायक खड्ड्यांमुळे या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत होते. विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे नाहक शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही केवळ दुर्लक्ष केले जात होते.
“प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला होता. जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी मनसे सदैव रस्त्यावर उतरेल. आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचे यावर पूर्ण लक्ष राहील.” — फाल्गुन गोहोकार (मनसे तालुकाध्यक्ष, वणी)
मनसेचा कडक इशारा अन् प्रशासनाची धावपळ
यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी मनसेच्या वतीने आंदोलन प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, गावातील एका दुर्दैवी घटनेमुळे आणि प्रशासनाच्या प्राथमिक आश्वासनानंतर ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, संपूर्ण महिना उलटूनही प्रशासनाकडून कामाची कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
त्यानंतर मनसे नेते राजेंद्र (राजू) उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात ठाणेदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच जि. प. बांधकाम विभागाला थेट ‘रस्ता रोको’चा इशारा देण्यात आला. “आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे जि. प. बांधकाम विभाग जबाबदार राहील,” या कडक इशाऱ्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले.
आंदोलनस्थळीच प्रशासनाची माघार
७ ऑक्टोबर रोजी आंदोलन सुरू होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे व इतर अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा करून जि. प. बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे डागडुजीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले, तसेच रस्ता नूतनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलल्यानंतर मनसेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.
मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने शेलू, नांदेपेरा आणि रांगणा परिसरातील ग्रामस्थांनी मनसेचे नेते, पदाधिकारी व सर्व आंदोलकांचे मनापासून आभार मानले आहे.





