चंद्रपूर (प्रतिनिधी) :-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची वर्ष २०२६-२७ या कालावधीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘कोळसा, खाणी आणि पोलाद उद्योग’ विषयक संसदीय स्थायी समितीवर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पुनर्नियुक्तीमुळे चंद्रपूर आणि विदर्भाच्या औद्योगिक प्रश्नांना पुन्हा एकदा संसदेत भक्कम व्यासपीठ मिळाले आहे.
लोकसभा सचिवालयाने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार (लोकसभा बुलेटिन भाग-२, परिच्छेद क्र. ६१८७) या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही नियुक्ती २६ सप्टेंबर २०२६ पासून अमलात आली आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनुराग सिंह ठाकूर यांची नियुक्ती माननीय लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आली आहे.
💥औद्योगिक व कामगार प्रश्नांना मिळणार बळ💥 चंद्रपूर हा जिल्हा कोळसा खाणी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी संपूर्ण देशात परिचित आहे. येथील कोळसा व खनिज क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्न, कामगारांचे हित, पर्यावरण संतुलन आणि स्थानिक उद्योगांचा सर्वांगीण विकास या गंभीर विषयांवर खासदार प्रतिभा धानोरकर या समितीच्या माध्यमातून संसदेत अधिक प्रभावीपणे आणि आक्रमकपणे आवाज उठवतील, असा दाट विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या पुनर्नियुक्तीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





