रात्री उशिरा झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तोडगा; महिनाअखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा – पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्यासह प्रलंबित मागण्यांवर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली :- देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांच्या आणि सर्वसामान्यांच्या डोक्यावर घिरट्या घालणारी ३ दिवसांच्या संपाची टांगती तलवार अखेर टळली आहे. बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि युनियनच्या दडपानाखाली अखेर व्यवस्थापनाला नमते घ्यावे लागले आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या अत्यंत नाट्यमय आणि मॅरेथॉन बैठकीनंतर बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे ऐन महिनाअखेरीस कोलमडणारे आर्थिक व्यवहार आणि बँकिंग सेवा पूर्ववत सुरू राहणार असल्याने ग्राहकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
काय होता वाद आणि का पुकारला होता संप? युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, पेन्शन सुधारणा कराव्यात आणि प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी सलग तीन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली होती. विशेष म्हणजे, हा संप महिनाअखेरीस आणि ३० सप्टेंबरच्या सहामाही लेखासमाप्तीच्या (Half-Yearly Closing) काळात असल्यामुळे देशभरातील वित्तीय बाजारात खळबळ उडाली होती. ग्राहकांची होणारी प्रचंड गैरसोय टळावी यासाठी खुद्द आरबीआय आणि केंद्र सरकारने रविवारी (२७ सप्टेंबर) सुट्टीच्या दिवशीही देशातील बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने प्रशासनावर तीव्र दबाब निर्माण झाला होता.
रात्री उशिराच्या बैठकीत काय ठरले ? परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, रविवारी रात्री ९:३० वाजता ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) आणि ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (UFBU) यांच्यात अतिशय संवेदनशील वातावरणात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
- उच्चस्तरीय समितीची स्थापना :- सर्व शनिवार बँक कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीचे दिवस घोषित करण्याच्या आणि पाच दिवसांच्या आठवड्याच्या प्रमुख मुद्द्यावर विचार करण्यासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन केली जाईल.
- मागण्यांवर सकारात्मक वाटाघाटी :- पीएलआय (PLI) योजना आणि ८ मार्च २०२४ च्या बैठकीत प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांवर दोन्ही बाजूंमध्ये सहमतीने तोडगा काढण्याचे ठरले.
- आंदोलन स्थगित :- चर्चेदरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर युनियन्सने नियोजित सर्व संप व आंदोलनात्मक कार्यक्रम स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
ग्राहकांना मोठा दिलासा संपाची हाक मागे घेतल्यामुळे आता सोमवारपासून देशभरातील सार्वजनिक व प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या शाखांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहे. महिनाअखेरीस पगार होण्याच्या तोंडावर बँक व्यवहारांचा खोळंबा होण्याचे संकट टळल्यामुळे व्यापारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य ग्राहकांनी मोठा निश्वास सोडला आहे.





