Home Breaking News वणीत कंत्राटदाराचा मनमानी कारभार; रखडलेल्या पांदण रस्त्यांमुळे शेतकरी संकटात; मनसेचा आंदोलनाचा इशारा.

वणीत कंत्राटदाराचा मनमानी कारभार; रखडलेल्या पांदण रस्त्यांमुळे शेतकरी संकटात; मनसेचा आंदोलनाचा इशारा.

वणी :- तालुक्यातील ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पांदण रस्ते’ योजनेची कामे संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात आणि पावसाळा तोंडावर असताना रस्ते चिखलमय व दुर्गम झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, येत्या दोन दिवसांत रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास प्रशासनाविरोधात ‘मनसे स्टाईल’ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.
प्रशासकीय संगनमताचा संशय
शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, शेलू ते निवली, पुरड ते नवेगाव, पुरड ते खांदला व पुरड ते निवली या मार्गांची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, ३० फूट रुंदीचा रस्ता मंजूर असताना काही ठिकाणी केवळ २० फूटच काम केले जात आहे. “प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने तर ही कपात होत नाही ना?” असा खडा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी
सध्या मशागतीची कामे आणि पेरण्यांचा हंगाम सुरू आहे. रस्ते खोदून ठेवल्यामुळे ट्रॅक्टर आणि बैलजोड्या नेणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच सरींत हे रस्ते चिखलात रूपांतरित होतील आणि पुढील चार महिने काम करणे अशक्य होईल, ही भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
“कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी राजा वेठीस धरला गेला आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून दोन दिवसांत काम पूर्ण करावे. अन्यथा, होणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासन जबाबदार असेल.”
फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे (वणी)

प्रशासनाला ठराविक कालावधीचा अल्टिमेटम
मनसेच्या वतीने तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, प्रविण कळसकर, गजानन मोहितकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.