Home Breaking News चंद्रपुरात मोठी कारवाई: भद्रावतीत १४ लाखांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त, नागपूरचा तस्कर अटकेत

चंद्रपुरात मोठी कारवाई: भद्रावतीत १४ लाखांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त, नागपूरचा तस्कर अटकेत

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भद्रावती हद्दीत मोठी कारवाई करत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईत ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १६८.९४ ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (Mephedrone Drug) आणि तस्करीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १४ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूर येथील अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (वय ४०, रा. तुकडोजी चौक, नागपूर) हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (क्र. MH-49-F-1569) मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्रीसाठी नागपूरवरून भद्रावतीकडे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ३ जून २०२६ रोजी पहाटे ००:३५ वाजताच्या सुमारास नागपूर-भद्रावती रोडवरील जमघट हॉटेलसमोर नाकाबंदी केली. संशयित कार थांबवून झडती घेतली असता, त्यात अमली पदार्थ आढळून आले.
पोलीस कारवाई
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम ८(C), २२(C) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि त्यांच्या पथकाने (विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार) केली आहे.