28 November 2026News Website

ताडोबा बफर क्षेत्रातील रुग्णांना वरोऱ्यात मोठा दिलासा; १४ मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी

वरोरा :-  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आणि दुर्गम भागातील रुग्णांना आता मोठ्या शस्त्रक्रियांसाठी दूरच्या शहरांमध्ये धाव घेण्याची गरज राहिली नाही. उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे आरोग्य विभाग, वन विभाग आणि मुंबई येथील ‘CODS Foundation’ यांच्या संयुक्त समन्वयातून आयोजित मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल १४ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.



ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील विविध आजारांनी त्रस्त नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी हे शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकित सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक काटारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील शस्त्रक्रिया कक्षात या सर्व शस्त्रक्रिया पार पडल्या. मुंबई येथील ‘CODS Foundation’चे डॉ. मुजफ्फर लकडावाला आणि त्यांच्या सहकारी पथकाने विशेष योगदान देत शस्त्रक्रिया पथकाच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर यशस्वी उपचार केले. ग्रामीण व वनक्षेत्रातील दुर्गम गावांत राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी बाहेरगावी जावे लागू नये व त्यांना जवळच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. या उपक्रमाचा बफर गावांतील नागरिकांना मोठा लाभ झाला आहे.



शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच डॉ. अंकुश राठोड, डॉ. सुषिम लोणारे, ऑपरेशन थिएटर (OT) इन्चार्ज श्रीमती चांदेकर, श्रीमती अंकिता टोंगे, प्रणाली गेडाम, सोनल भगत, शीतल राठोड, अमोल भोंग, सागर कपाते, समीर किनाके, छोटू मडावी आणि अमोल भोयर यांनी शिबिराच्या नियोजनापासून ते शस्त्रक्रिया व रुग्णसेवेपर्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.



वैद्यकीय अधिकारी, शस्त्रक्रिया पथक, परिचारिका व ऑपरेशन थिएटर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांचा सार्वजनिक आरोग्यसेवेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.

अभिषेक किशोर भागडे