Home Breaking News नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,...

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १ कोटी ९२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त.

नागपूर :- नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत झारखंडमधील सिमडेगा येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तब्बल १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
👉नेमकी घटना काय ?
२० मे २०२६ रोजी उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत, उमरेड ते नागपूर रोडवरील उदासा उडान पुलाजवळ एका ट्रक चालकाकडून पोलिसांनी २३७.१७० ग्रॅम अफू (अफिम) जप्त केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशन उमरेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांनी विशेष तपास पथक तयार करून गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते.
👉 तपासाची चक्रे फिरली आणि झारखंडपर्यंत पोहोचली.
पोलिस पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय तपास आणि अथक परिश्रमाच्या जोरावर या गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढली. या तस्करीचे धागेदोरे झारखंड राज्यातील सिमडेगापर्यंत पोहोचले. तपास पथकाने सिमडेगा जिल्ह्यातील भंडारटोली (करपनादास, ता. ठेठईटांगल) परिसरात छापा टाकला.
२५ मे २०२६ रोजी पोलिसांनी येथील हॉटेल व्यावसायिक मनिषकुमार अंबिकाप्रसाद (वय ४६ वर्षे) याला या गुन्ह्यात अटक केली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता, तिथे तब्बल ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू (अफिम) सापडली.
👉 जप्त केलेला मुद्देमाल.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू (किंमत १,६८,८३,५००/- रुपये), रोख रक्कम २३,३५,०००/- रुपये, मोबाईल हँडसेट, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि इतर साहित्यासह एकूण १,९२,३६,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ३४ किलो ४ ग्रॅम १७० मिली ग्रॅम अफू आणि एकूण २,२५,६८,०८५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

🙏 जय विदर्भ 🙏