वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
आनंदवन शारीरिक मर्यादांवर जिद्दीने मात करत आनंदवन येथील ‘निजबल शिक्षा निकेतन’ मधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. बारावी पाठोपाठ आता दहावीच्या निकालातही या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली असून, संपूर्ण वरोरा तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
२९ दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
महारोगी सेवा समिती, वरोरा संचलित आनंदवन येथे गेल्या तीन दशकांपासून दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर्षी १७ नंबरचा अर्ज भरून २२ कर्णबधिर आणि ७ अंध अशा एकूण २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यात ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
🛑 गुणवंत विद्यार्थ्यांची चमक 🛑
👉 कु. गायत्री प्रवीण मत्ते (कर्णबधिर):-६५.६०% गुणांसह प्रथम स्थान.
👉 रोशन बबन पोहनकर (कर्णबधिर):-६३.८०% गुणांसह द्वितीय स्थान.
👉 आकाश शंकर मन्ने (अंध):-६२.००% गुणांसह अंध प्रवर्गातून विशेष प्राविण्य.
विनामूल्य निवास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
आनंदवनात या विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशच दिला जात नाही, तर विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्गही घेतले जातात. विशेष शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या चिकाटीमुळेच हे यश शक्य झाले आहे. या यशात व्यवस्थापकीय अधिक्षक रवींद्र नालगिंटवार, समन्वयक इक्राम पटेल यांच्यासह प्रवीण ताठे, सौरव वानखेडे, गणेश जायनाकर, रमेश बोपचे, प्रणित भेले आणि कला शिक्षक प्रशांत गवई यांचे मोलाचे योगदान लाभले.
🛑 सहकार्यातून साध्य झाले यश 🛑
अंध विद्यार्थ्यांच्या लेखनिक म्हणून आनंद माध्यमिक विद्यालय (आनंदवन) आणि लोकमान्य विद्यालय (वरोरा) येथील ९ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राखे सर आणि त्यांच्या टीमचे मार्गदर्शन या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे ठरले.
🛑 मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव 🛑
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे , व्यवस्थापिका पल्लवी आमटे , विश्वस्त डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, सदाशिव ताजने आणि माधव कवीश्वर यांच्यासह संपूर्ण आनंदवनवासियांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




