वरोरा :-सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांच्या नावाखाली वरोरा तालुक्यात, विशेषतः वरोरा परिसरात सट्टेबाजीच्या अवैध धंद्याने उच्छाद मांडला आहे. मोबाईल अॅप्स आणि गुप्त आयडीच्या माध्यमातून चालणाऱ्या या ‘डिजिटल जुगाराने’ शहरी व ग्रामीण भागातील तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढले असून, अनेक कुटुंबे देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे
🛑 कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलह वाढला🛑
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील व वरोरा परिसरातील अनेक तरुण सट्टा खेळण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने कर्ज काढत आहेत. सट्ट्यातील पराभवामुळे हे तरुण मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले असून, याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. घराघरांत तणावाचे वातावरण असून पालकांमध्ये आपल्या मुलांच्या भविष्याबाबत तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.
🛑 प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय ?🛑
स्थानिक नागरिक उघडपणे आरोप करत आहेत की, काही स्थानिक व्यक्ती बिनदिक्कतपणे ऑनलाईन आयडी देऊन हा सट्टा चालवत आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे सट्टा चालवणाऱ्यांचे धाडस अधिकच वाढले आहे.
👉 “मोबाईल अॅप्स आणि गुप्त आयडीच्या माध्यमातून सुरू असलेला हा डिजिटल जुगार समाजासाठी अत्यंत घातक ठरत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून तरुणाईला वाचवावे.
🛑 तात्काळ कारवाईची मागणी 🛑
अशा प्रकारे सट्टेबाजीमुळे तरुणांचे भवितव्य अंधारात जात असून, प्रशासनाने सट्टा चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्का किंवा तत्सम कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




