वरोरा :-माढेळी येथील मुख्य चौक माढेळी-वरोरा-नागरी टी पॉइंट मार्गावरील श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज चौकातील अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीबाबत माढेळी येथील माजी सैनिक सचिन धात्रक यांनी उठविलेल्या आवाजाला मोठे यश आले आहे. प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांच्या आत रस्त्याच्या प्रलंबित कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
👉 काय होती परिस्थिती ?
गेल्या अनेक दिवसांपासून या चौकात रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडले होते. उघडे खड्डे, कचऱ्याचे ढिगारे आणि सुरक्षेसाठी कोणतेही बॅरिकेडिंग नसल्यामुळे हा परिसर अपघाताचा केंद्रबिंदू बनला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होत होते, तर दर सोमवारी भरणारे आठवडी बाजार आणि एसटी बसच्या वळणामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी व अपघाताची भीती व्यक्त केली जात होती.
👉 सचिन धात्रक यांचा आक्रमक पवित्रा
“हा रस्ता आहे की सापळा ?” असा संतप्त सवाल करत माजी सैनिक सचिन धात्रक यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार की ग्रामपंचायत ? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या मागणीला स्थानिक नागरिकांनीही मोठा पाठिंबा दिला होता.
👉 प्रशासनाची तत्परता
बातमीची दखल आणि माजी सैनिकांच्या आक्रमक मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाली केल्या. मागणी केल्यानंतर २४ तासांच्या आतच खड्डे बुजविण्याचे आणि अर्धवट रस्ते पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
“नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा होता. प्रशासनाने तत्परता दाखवून काम सुरू केले, ही आनंदाची बाब आहे. यापुढेही जनहिताच्या कामांसाठी माझा लढा सुरूच राहील.”
‼️सचिन धात्रक, माजी सैनिक, माढेळी‼️
चौकातील धोकादायक परिस्थिती दूर होत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, वरोरा परिसरात माजी सैनिकाच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले जात आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




