” तपास यंत्रणा आणि अभियोग पक्षाच्या भक्कम कामगिरीमुळे गंभीर गुन्ह्यांत दोषसिद्धीचे प्रमाण वाढले; ‘गुन्हा करा आणि जामिनावर बाहेर फिरा’ या पॅटर्नला बसला लगाम”
यवतमाळ :- जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तपास यंत्रणेतील त्रुटी दूर करून अभियोग पक्षाने न्यायालयात भक्कम बाजू मांडल्याने जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या अवघ्या दहा महिन्यांत तब्बल १५ खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींना आजन्म कारावासाची (जन्मठेप) कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
तपासाची पद्धत बदलली, गुन्हेगारांची पळवाट बंद यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करणे हा केवळ एक सोपस्कार बनला होता. यातील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत गंभीर गुन्ह्यांतील आरोपी न्यायालयातून सुटत होते आणि दोषसिद्धीचे प्रमाण घटले होते. मात्र, या उणिवा शोधून दोषारोपपत्र तयार करताना त्यातील आरोप न्यायालयात सिद्ध कसे होतील, यावर विशेष काम करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि अभियोग पक्षाने दोषारोपपत्रांची काटेकोर पडताळणी करून सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
८४ गंभीर गुन्ह्यांचा निकाल, न्यायप्रक्रियेला गती मागील दहा महिन्यांत सत्र न्यायालयाने ८४ गंभीर गुन्ह्यांची सुनावणी पूर्ण करून खटले निकाली काढले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार यांसारखे गंभीर खटले अनेक महिने प्रलंबित राहत होते आणि बचाव पक्ष कायदेशीर तरतुदींचा आधार घेत खटला लांबवत होता. आता नियमित सुनावणी होत असल्याने कामकाजाला मोठी गती मिळाली आहे. न्यायपालिकेसोबतच तपास यंत्रणेनेही कामाची पद्धत बदलली असून साक्ष तपासणी आणि दोषारोपपत्रातील प्रत्येक आरोपाची उलट तपासणी करून घटनेतील वास्तव समोर आणले जात आहे.
बाललैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतही नराधमांना कायद्याचा दणका बसला आहे. तब्बल ८ गुन्ह्यांतील आरोपींना ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये वणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात केळापूर सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली आहे.
गुन्हेगारीचा ‘जामीन पॅटर्न’ मोडीत “कितीही गंभीर गुन्हा केला तरी सहज जामीन मिळतो, केवळ आठ महिने न्यायालयीन कोठडीत काढावे लागतात आणि खटला कित्येक वर्षे सुरू राहतो,” असा गैरसमज गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे यवतमाळ शहर व जिल्ह्यात शरीर दुखापतीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु, आता न्यायालयात भक्कम साक्षी-पुरावे सादर होत असल्याने सहज जामीन मिळत नाही आणि पुढे कठोर शिक्षा होते, याची मोठी धास्ती गुन्हेगारांमध्ये निर्माण झाली आहे. ज्या दोषारोपपत्रात विसंगती आढळली, त्याचा फायदा मिळून काही आरोपी निर्दोष सुटले असले, तरी साक्षी-पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झालेल्यांना कायद्याने कठोर शिक्षा ठोठावली आहे.
सत्र न्यायालयात ५ हजार ७२० खटले प्रलंबित
यवतमाळ न्यायालयातील कामाचा व्याप सातत्याने वाढत आहे. सध्या येथील सत्र न्यायालयात तब्बल ५ हजार ७२० खटले सुरू असून, त्यांचा जलद गतीने निवाडा करण्याचे प्रयत्न न्यायव्यवस्था व प्रशासनाकडून सुरू आहेत.
२०२६ मधील निकाली निघालेल्या क्रिमिनल केसेसचा लेखाजोखा (तक्ता)
| महिना | दाखल खटले | निकाली खटले |
|---|---|---|
| जानेवारी | २०२९ | १८७६ |
| फेब्रुवारी | २५६९ | १३०८ |
| मार्च | ३४७० | ३९९४ |
| एप्रिल | २०४७ | १००८ |
| मे | २७०१ | ३३३७ |
| जून | २४९३ | १०९८ |
| जुलै | ३१८३ | १४४६ |
| ऑगस्ट | २९३७ | १११९ |
| सप्टेंबर | ३५३० | ४१९८ |
| ऑक्टोबर | ३९७५ | १२९० |





