28 November 2026News Website

बुटांच्या ठशावरून काढला घरफोड्यांचा माग; वरोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! नागपूरच्या दोघा चोरट्यांना ठोकल्या बेड्या; ३०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा :- लग्नानिमित्त मुंबईला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल २६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या नागपूर येथील दोन सराईत चोरट्यांच्या वरोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नसताना केवळ कंपाऊंडच्या गेटवरील बुटांच्या तळव्याच्या ठशावरून आणि त्यावरील धुळीच्या अंदाजावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ३० लाख ३५ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



नेमकी घटना काय 👉 वरोरा शहरातील हनुमान व्यायाम शाळेजवळ राहणाऱ्या समीना अलीअसगर बोहरा या आपल्या कुटुंबासह १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता घराला कुलूप लावून लग्नानिमित्त मुंबईला गेल्या होत्या. लग्नकार्य आटोपून ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता त्या घरी परतल्या असता, मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.



असा लागला गुन्ह्याचा छडा 👉 घर सलग पाच दिवस बंद असल्याने चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते; शिवाय घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरेही नव्हते. मात्र, वरोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी.) घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी केली असता, घराच्या कंपाऊंडच्या लोखंडी गेटवर बुटाच्या तळव्याचे ठसे आढळले. त्या ठशांवर धूळ अत्यंत कमी असल्याने ही चोरी ५ नोव्हेंबरच्या पहाटेच किंवा रात्रीच्या सुमारास झाली असल्याचा अचूक अंदाज पोलिसांनी बांधला.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मध्यरात्री एक कार संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी नागपूर येथून सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादुर गुप्ता (वय ४१, रा. यशोधरानगर, नागपूर) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय ३५, रा. नौकन्यानगर, नागपूर) या दोघांना अटक केली.

३०.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत :- पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला असून त्यात खालील वस्तूंचा समावेश आहे:

  • सोन्याचे दागिने :- २१०.६५ ग्रॅम वजन (किंमत २९ लाख ७० हजार १६५ रुपये)
  • चांदीचे शिक्के व डबी :- ५४.३८ ग्रॅम वजन (किंमत १४ हजार ०३३ रुपये)
  • रोख रक्कम :- २१ हजार रुपये
  • मोबाईल फोन :- दोन अँड्रॉइड मोबाईल (किंमत २० हजार रुपये) व एक साधा मोबाईल (किंमत १ हजार रुपये)
  • इतर पुरावे :- घटनास्थळावरील ठशांशी जुळणारे आरोपीचे बूट आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला टी-शर्ट.

या पथकाने केली कारवाई :- सदरची धडाकेबाज कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, वरोराचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि दहीफळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि मनीष तालेवार, पोहवा संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सुखराज यादव, महेश गावतुरे आणि सौरभ कुलथे यांच्या पथकाने पार पाडली.

 

अभिषेक किशोर भागडे