पांढरकवडा :- आर्णी-केळापूर मतदारसंघातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सक्षम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी स्थानिक आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार श्री. प्रकाशजी आबिटकर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान मतदारसंघातील दोन प्रमुख आरोग्यविषयक समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
- प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती :- पहापळ, अर्ली, पारवा, रामपूर, भांबोरा, शिवणी आणि सदोबा सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची झालेली दुरवस्था लक्षात घेता, रुग्णांच्या सुरक्षेसाठी या इमारतींच्या दुरुस्तीची कामे अत्यंत गरजेची आहेत. त्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदारांनी केली.
- नवीन उपकेंद्रे व पायाभूत सुविधांची उभारणी :- मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी केळापूर व पिंपरी रोड येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच पांढूर्णा, तरोडा आणि सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि संरक्षण भिंतींचे बांधकाम करण्याबाबतही चर्चा झाली.
“ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला आमचे नेहमीच प्रथम प्राधान्य राहिले आहे. दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर व सुरक्षित वातावरणात उपचार मिळावेत, यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. या सर्व विकासकामांना शासनाने प्राधान्य देऊन निधी लवकरात लवकर वर्ग करावा,” अशी विनंती आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी मंत्रिमहोदयांकडे केली.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेत सकारात्मक पाऊल उचलण्याचे आणि संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार तोडसाम यांच्या या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





