6 November 2026News Website

सहकार व सामाजिक क्षेत्रातील देदीप्यमान कार्याचा गौरव!

सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष श्री. रवींद्रजी शिंदे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘लोकमत विदर्भ भूषण २०२६’ पुरस्कार प्रदान

नागपूर :- सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे खंबीर नेतृत्व, ‘श्री. श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्ट’ व ‘रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक आणि सी.डी.सी.सी. बँकेचे कार्यकुशल अध्यक्ष श्री. रवींद्रजी शिंदे यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील उत्तुंग आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अतिशय प्रतिष्ठेच्या ‘लोकमत विदर्भ भूषण २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नागपूर येथील हॉटेल मेरिडियन येथे आयोजित एका भव्य व दिमाखदार सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते श्री. रवींद्रजी शिंदे यांना हा पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

सहकाराचा आदर्श आणि सामाजिक बांधीलकीचा वारसा

श्री. रवींद्रजी शिंदे यांनी सी.डी.सी.सी. बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. शेतकऱ्यांचे हित, सहकाराचे बळकटीकरण आणि पारदर्शक कारभार या त्रिसूत्रीवर भर देत त्यांनी सहकार क्षेत्रात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. केवळ सहकारच नव्हे, तर श्री. श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्ट व रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि गरजूंना मदत यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विश्वास संपादन केला आहे.

“हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा गौरव नसून सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टाचे फळ आहे. या सन्मानाने माझी समाजाप्रती असणारी जबाबदारी आणखी वाढली आहे.” श्री. रवींद्रजी शिंदे (पुरस्कार स्वीकारल्यानंतर)

दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छांचा वर्षाव

हॉटेल मेरिडियनमधील या सोहळ्याला राजकीय, सहकार, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी श्री. शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.पुरस्काराचे वृत्त समजताच सहकार क्षेत्र, राजकीय वर्तुळ आणि त्यांच्या चाहत्यांकडून श्री. रवींद्रजी शिंदे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.

 

अभिषेक किशोर भागडे