6 November 2026News Website

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा ‘काळा दिवस’; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात शिवाजी महाराज चौकात धडक निषेध आंदोलन!

ब्रम्हपुरी :- भारतीय लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात असल्याचा आरोप करत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार ब्रम्हपुरी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (८ ऑक्टोबर) ब्रम्हपुरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. लोकशाहीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

आंदोलनातील प्रमुख मुद्दे:

  • ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांवर लाठीचार्जचा निषेध :- निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततेत जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी व ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना रोखत त्यांच्यावर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
  • संविधानावरील थेट हल्ला :- जनतेचे प्रतिनिधी आणि विरोधी पक्षनेत्यांवर केलेली ही दडपशाही म्हणजे थेट संविधानावरील आणि लोकशाहीवरील हल्ला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली.
  • मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी :- निवडणूक आयोगाची निष्पक्षता संशयास्पद ठरल्याने, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
  • आक्रमक घोषणाबाजी :- केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

“जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविले जात नाही आणि निवडणूक व्यवस्थेची निष्पक्षता पूर्णपणे बहाल होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील,” असा सज्जड इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनादरम्यान दिला.

यावेळी ब्रम्हपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध फ्रंटल व सेलचे प्रमुख, नगरपरिषदेचे पदाधिकारी, ग्राम काँग्रेसचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

अभिषेक किशोर भागडे