7 November 2026News Website

तहसील कार्यालयापुढील उपोषण अखेर मागे; मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मध्यस्थीने मिलमिले कुटुंबाला मिळाली जमीन

वणी/प्रतिनिधी:- वडगाव (टीप) तह. वणी, जिल्हा. यवतमाळ येथील ‘मननस ॲग्रो’ कंपनीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून वणी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुवर्णा विजय मिलमिले व त्यांच्या कन्या प्रिया मिलमिले यांच्या उपोषणाची आज अखेर सांगता झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कंपनी आणि तहसील प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीमती सुवर्णा मिलमिले यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या शेताची रीतसर मोजणी केली होती. त्यावेळी शेजारीच असलेल्या ‘मननस ॲग्रो’ कंपनीच्या ताब्यात त्यांची ०.०४ हेक्टर आर (४ आर) जमीन असल्याचे समोर आले होते. गेल्या तीन वर्षांपासून मिलमिले कुटुंब आपल्या हक्काच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, कंपनी प्रशासनाकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप करत, न्यायाच्या मागणीसाठी माय-लेकींनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
उपोषणाची माहिती मिळताच मनसे नेते राजू उंबरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मिलमिले कुटुंबाची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ ‘मननस ॲग्रो’ कंपनीचे मालक आणि वणीचे तहसीलदार यांच्याशी थेट चर्चा केली. आज, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील प्रशासन आणि कंपनी प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
कंपनीने आपल्या ताब्यातील ०.०४ हेक्टर आर जमिनीचा ताबा मिलमिले कुटुंबाला देण्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. तसेच, कंपनीची जोपर्यंत अधिकृत मोजणी होत नाही, तोपर्यंत सदर जागेवर कच्च्या स्वरूपाचे कंपाऊंड करण्यात यावे, अशी विनंती कंपनी प्रशासनाने केली.
प्रशासन आणि कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सुवर्णा मिलमिले व प्रिया मिलमिले यांनी आपले उपोषण मागे घेतले. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल मिलमिले कुटुंबीयांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह फाल्गुन गोहोकार व उपस्थित सर्व मनसे पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अभिषेक किशोर भागडे