मूल (चंद्रपूर) :- अवैध तंबाखू तस्करीविरोधात मूल पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ६ लाख ९९ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईमुळे तंबाखू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी मूल येथील उमा नदी नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी गोंदियाहून मूलकडे येणारे बोलेरो पिकअप (MH-35 AJ-3595) अडविले. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित हुक्का शिशा तंबाखू आणि खुला तंबाखू आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत ३० किलो हुक्का शिशा तंबाखू (₹३९,७५०), २० प्लास्टिक चुंगळ्यांमधील खुला तंबाखू (₹१,६०,०००) आणि ₹५ लाख किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ₹६,९९,७५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक राहुल हिरालाल मल्लेवार (वय २६, रा. गोरेगाव, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
घटनास्थळी पंचनामा करून ई-साक्ष ॲपद्वारे छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करण्यात आली. जप्त मुद्देमाल मूल पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आला असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
ही कारवाई श्री. आयुष नोपानी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) श्री. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) श्री. सत्यजित आमले (उपविभागीय पोलीस अधिकारी) श्री. विजय राठोड (पोलीस निरीक्षक, पो. स्टे. मूल) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारवाई करणारे पथक पोलीस उपनिरीक्षक ,रुपेश कुंभरे पोलीस हवालदार पंकज बगडे,पोलीस,हवालदार भास्कर कोवे पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




