Home क्राईम गडचांदूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई: १२ चाकी ट्रकमधून ३५ गोवंश जनावरांची सुटका, २२...

गडचांदूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई: १२ चाकी ट्रकमधून ३५ गोवंश जनावरांची सुटका, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

गडचांदूर (प्रतिनिधी) :-पोलिस स्टेशन गडचांदूर येथील गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ३५ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी ट्रकमधील अज्ञात चालकाविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



💥 गुप्त माहितीवरून सापळा💥
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०५/०८/२०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली होती की, चंद्रपूर मार्गाने भोयगाव ते गडचांदूर मार्गाने एका टाटा कंपनीच्या १२ चाकी ट्रकमध्ये (क्र. एम.एच.२७ एक्स ८८८६) गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरिता घेऊन जाणारे आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा भोयगाव येथे नाकाबंदी केली. दिनांक ०६/०८/२०२६ रोजी पहाटे ०३:३० वाजताच्या दरम्यान एक ट्रक भोयगाव कडे येत असताना दिसला. पोलिसांनी हाताच्या इशाऱ्याने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने न थांबता ट्रक भरधाव वेगाने गडचांदूर मार्ग तेलंगणा राज्याकडे नेण्यास सुरुवात केली.



💥 सिनेस्टाईल पाठलाग आणि जप्ती 💥
पोलिसांनी तात्काळ सदर वाहनाचा पाठलाग केला व वरिष्ठांना माहिती देऊन मौजा परसोडा फाटा (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथे ट्रक थांबवला. मात्र, ट्रक चालक आपले वाहन तिथेच थांबवून जंगलाच्या दिशेने पळून गेला. पंचांसमक्ष ट्रकची पाहणी केली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
गोवंश जनावरे :- लहान-मोठे बैल एकूण ३५ नग, अंदाजे किंमत ७,००,०००/- रुपये. मोबाईल गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, किंमत १,०००/- रुपये. ट्रक :-गुन्ह्यात वापरलेला १२ चाकी ट्रक, किंमत १५,००,०००/- रुपये.
एकूण मुद्देमाल :-२२,०१,०००/- रुपये.
जप्त केलेली जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच वैद्यकीय तपासणी व चारापाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी ‘प्यार फाऊंडेशन चंद्रपूर’ येथे दाखल करण्यात आली आहेत.



💥 आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल 💥
सदर ट्रक चालक तथा मालक आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन गडचांदूर येथे अपराध क्रमांक ४०९/२०२६ नुसार भारताचा प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१),(घ),(ड),(च),(ज), सहकलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, सहकलम ३२५, २८१ भा.न्या.सं. तसेच सहकलम १८४, २३९ मोवाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



🙏 मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी 🙏
सदरची धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव (उपविभाग गडचांदूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शिवाजी कदम (पोलिस स्टेशन गडचांदूर) यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि पंकज हेकाड, नापोअं बलवंत शर्मा, साईनाथ उपरे, पो.अं. मनोहर जाधव, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर आणि राजरतन बोरुडे यांनी पार पाडली आहे.