नागपूर :-नागपूर शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मंगळवारी रात्री फुटाळा तलाव परिसरात झालेल्या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. कुख्यात गँगस्टर शेखूचा भाचा, असद उर्फ अमन खान याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असद उर्फ अमन खान याचा ‘लाला पांडे’ आणि त्याच्या साथीदारांशी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, लाला पांडे आणि त्याच्या साथीदारांनी असदवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात असदचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मयूर जाधव (३०) गंभीर जखमी झाला आहे.
💠 पोलीस यंत्रणा सतर्क 💠
या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी लाला पांडे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सर्व बाजूने तपास केला जात आहे.




