Home Breaking News सावंगी हॉस्पिटलमधील ‘औषध’ कारभार वादाच्या भोवऱ्यात; रुग्णांच्या हक्कांवर गदा

सावंगी हॉस्पिटलमधील ‘औषध’ कारभार वादाच्या भोवऱ्यात; रुग्णांच्या हक्कांवर गदा

वर्धा :- जिल्ह्यातील सावंगी येथील ‘एव्हीबीआरएच’ (AVBRH) हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हॉस्पिटलमधील औषध वितरण आणि खरेदी प्रक्रियेत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या मनमानी त्रासामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे किंवा संगणकीकृत औषधांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना न दाखवता थेट हॉस्पिटलमधील औषध दुकानाकडे (केमिस्ट शॉप) पाठवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे रुग्णांच्या निवडीच्या अधिकारावर गदा येत असून, औषधे खरेदीसाठी त्यांना एकाच ठिकाणाहून औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याचे आरोप होत आहेत.
प्रमुख तक्रारी :- 
👉  औषधांच्या माहितीची रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही कल्पना दिली जात नाही.
👉  औषध वितरणात पारदर्शकतेचा अभाव.
👉  रुग्णांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन.
💠 प्रशासनाची भूमिका काय 💠
औषध वितरण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र संताप आहे. एका रुग्णाने यासंदर्भात ‘जन-संग्राम’कडे तक्रार नोंदवून, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट-१९४०’ आणि ‘कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट-२०१९’ नुसार आता अन्न व औषध प्रशासन, वर्धा संबंधित अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.