Home Breaking News स्मार्ट मीटर सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका; वणीत मनसे आक्रमक!

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका; वणीत मनसे आक्रमक!

वणी :- महावितरण कंपनीकडून ग्राहकांवर लादली जाणारी ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती आता चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे मीटर ग्राहकांच्या हिताचे नसून, एका ठराविक ठेकेदाराचे खिसे भरण्याचे आणि सर्वसामान्यांवर बोजा टाकण्याचे ‘षडयंत्र’ असल्याचा खळबळजनक आरोप करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात दंड थोपटले आहेत. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ‘तीव्र आंदोलनाचा’ इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत, महावितरणची मनमानी!
निवेदन सादर करताना मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि महावितरणच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली. “एकीकडे मुख्यमंत्री जाहीरपणे सांगतात की, स्मार्ट मीटरची सक्ती नाही, तर दुसरीकडे महावितरण ग्राहकांना सक्तीचे मेसेज पाठवून धमकावत आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश हवेत विरले आहेत का? की मुख्यमंत्री जनतेला खोटे बोलून दिशाभूल करत आहेत?” असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
    💠 पोलीस प्रशासनालाही खडे बोल 💠
स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्या नागरिकांवर महावितरणच्या दबावाखाली पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे ठणकावून सांगतानाच, “पोलिसांनी महावितरणचे ‘रिकव्हरी एजंट’ म्हणून काम करणे तात्काळ थांबवावे,” अशी मागणी मनसेने केली आहे.
💠 मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा 💠
फाल्गुन गोहोकार यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, “ग्राहकांच्या परवानगीशिवाय बळजबरीने स्मार्ट मीटर बसवल्यास किंवा विरोध करणाऱ्यांवर कारवाई केल्यास मनसे शांत बसणार नाही. यानंतर होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला महावितरण आणि स्थानिक प्रशासनच जबाबदार राहील.”
यावेळी जिल्हाधिकारी, यवतमाळ आणि संबंधित पोलीस व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी महेश हातगावकर, धीरज पिदुरकर, गोविंद थेरे, प्रविण कळसकर, प्रतिक बुरडकर, सुजित मेश्राम, गणेश खरवडे, मनोज उरकुडे, सुरज काकडे, धीरज बगवा, सोमेश्वर ढवस, प्रफुल सातपुते, मंगेश ढेंगळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
“जनतेच्या मर्जीशिवाय खासगी जागेत स्मार्ट मीटर बसवण्याचा महावितरणला कोणताही अधिकार नाही. जर बळजबरी थांबली नाही, तर महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका नक्कीच बसेल!”
💠फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे (वणी)💠