Home Breaking News महावितरणचा ‘स्मार्ट मीटर’चा घाट म्हणजे हुकूमशाही; मनसेचा सरकारला इशारा, अन्यथा होणार ‘करंट...

महावितरणचा ‘स्मार्ट मीटर’चा घाट म्हणजे हुकूमशाही; मनसेचा सरकारला इशारा, अन्यथा होणार ‘करंट आंदोलन’!

मुंबई :- महाराष्ट्रात सध्या महावितरणकडून सक्तीने लादल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट मीटर’ प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, या प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, हा प्रकल्प त्वरित स्थगित न केल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
🙏सामान्य जनतेच्या मनात भीती आणि संशय🙏
नांदगावकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महावितरण ज्या पद्धतीने ग्राहकांना अवघ्या ४८ तासांची नोटीस देऊन सक्तीने स्मार्ट मीटर बसवत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावून ग्राहकांवर “दुसरा पर्यायच नाही” अशी हुकूमशाही लादली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
🙏कोणाचा फायदा? कोणाचे नुकसान🙏
“हा प्रकल्प जनतेच्या सुविधेसाठी आहे की काही मोजक्या खासगी उद्योजकांच्या फायद्यासाठी?” असा सवाल उपस्थित करत, नांदगावकर यांनी या प्रकल्पातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “अब्जावधी रुपयांच्या या प्रकल्पाचा खरा लाभार्थी कोण? कष्टकरी जनता की अडाणीसारख्या बड्या खासगी कंपन्या?” असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
       🙏मनसेच्या पाच प्रमुख मागण्या🙏
जनतेच्या वाढत्या संतापाची दखल घेत मनसेने खालील मागण्या केल्या आहेत:
१. राज्यभरात सुरू असलेला स्मार्ट मीटर बसवण्याचा सक्तीचा प्रकल्प त्वरित स्थगित करावा.
२. कोणत्याही ग्राहकाच्या घरी मीटर बदलण्यापूर्वी त्यांची लेखी संमती अनिवार्य करावी.
३. आतापर्यंत बसवलेल्या मीटरमुळे आलेल्या वाढीव बिलांची आणि अतिरिक्त दंडाची उच्चस्तरीय चौकशी करावी; तोपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये.
४. स्मार्ट मीटर प्रकल्पाशी संबंधित सर्व आर्थिक, तांत्रिक करार सार्वजनिक करावेत.
५. सर्वसामान्य नागरिक, ग्राहक संघटना आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी.
जनतेच्या संयमाची परीक्षा नको!
“महावितरण आणि राज्य सरकारने जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये. रक्ताचे पाणी करून जगणाऱ्या माणसावर कोणतीही जुलमी योजना सक्तीने लादल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही,” अशा कडक शब्दांत इशारा देत, जर या प्रश्नांवर पारदर्शकता न राखता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र ‘करंट आंदोलन’ उभारले जाईल, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.