7 November 2026News Website

येरवडा कारागृहात कैद्याला तिघांकडून मारहाण

पुणे (Pune) 26 जून :- येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

येरवडा कारागृहातील सीजे विभागातील बॅरेक क्रमांक एकच्या परिसरातमारहाणीची घटना घडली होती. कैदी योगेश जगदीश सोनवणे बराकीत बसला होता. त्यावेळी आरोपी काळे, भोसले, सासवडे यांनी सोनवणेला बराकीच्या बाहेर बोलावले. प्रतिस्पर्धी गटाला माहिती देतो, असे सांगून आरोपींनी सोनवणेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बराकीत हाणामारी झाल्याची घटना घडल्यानंतर बंदोबस्तावरील रक्षकांनी काळे, भोसले, सासवडे यांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करत आहेत.

अभिषेक किशोर भागडे