मुंबई :- ऑनलाइन आरक्षण, मॅन्युअल तिकीट, गणेशोत्सव आणि तीर्थाटन योजनांबाबत एसटी महामंडळाचे महत्त्वपूर्ण निर्देश स्पष्ट दिनांक: ०२ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारकरीता दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ (NCMC) कार्डबाबत वाहतूक विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक परिपत्रक जारी केले आहे. प्रवाशांची होणारी वाढती गर्दी, सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन महामंडळाने सर्व सवलतधारकांसाठी विविध दिलासादायक बाबी व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
मा. परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, म.रा.म.प्र. महामंडळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीनुसार अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना एसटी महामंडळात तिकीट सवलत प्राप्त करण्यासाठी ०१ ऑगस्ट २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. या अनिर्वायतेला दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता वाहतूक खात्याच्या पत्रकानुसार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ पासून ही अंमलबजावणी सुरू झाली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे सर्व ६ महत्त्वाचे मुद्दे लागू करण्यात आले आहेत.
1. ऑनलाइन आरक्षित तिकीट धारकांना सवलत
ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी प्रवासाचे तिकीट आधीच ऑनलाइन आरक्षण केले होते, अशा प्रवाशांना एकवेळची खास बाब म्हणून NCMC कार्ड अनिवार्य न करता, आरक्षित तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे.
2. नोंदणी केली पण कार्ड हातात मिळाले नाही अशांना मुभा.
ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे, परंतु अद्याप सदर लाभार्थ्यास NCMC कार्ड प्राप्त झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना नोंदणी केलेली पावती ग्राह्य धरून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्यास दि. ३०.०९.२०२६ पर्यंत मुभा देण्यात आली आहे.
3. तीर्थाटन व श्रावण मास विशेष बससेवा सुरक्षित
प्रवाशांना परवडेल अशा दरात स्वस्त व सुरक्षित धार्मिक पर्यटन उपलब्ध करून देण्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संग तीर्थाटन योजना’ सुरू करण्यात आली आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने विशेष बससेवा चालवली जात असून, दि. १२.०९.२०२६ पर्यंत या विशेष बसमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना जुन्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवास सवलत लागू राहील.
4. गणेशोत्सवाच्या ग्रुप बुकिंगला सवलत
गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या ग्रुप बुकिंगमधील ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना NCMC कार्ड अनिवार्य न करता, सदर आरक्षित केलेल्या तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे.
5.सक्रिय कार्डधारकांसाठी सक्ती
ज्या लाभार्थ्यांकडे आधीपासूनच Active NCMC Card उपलब्ध आहे, त्यांनी सदर कार्डमधूनच सवलतीचे तिकीट घेणे बंधनकारक राहील.
6. सर्व्हर डाऊन व तांत्रिक अडचणींमुळे मॅन्युअल तिकिटास १४ सप्टेंबरपर्यंत मुभा.
दि. ०१ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य केल्याने प्रवासी संख्येमुळे NCMC कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर प्रचंड ताण वाढला असून Hits वाढल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रवास दरम्यान सवलतीचे तिकीट देताना तांत्रिक अडचणी येत असून प्रवासी तक्रारी निर्माण होत आहेत. यामुळे दि. १४.०९.२०२६ पर्यंत सदर सवलतधारकांना सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
वरील नमूद सर्व बाबींना मा. सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी प्राप्त झाली असून, आपल्या अखत्यारीतील सर्व आगार व्यवस्थापक, वाहक तसेच चालक तथा वाहक यांना या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी दिले आहेत.




