चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर 2026 :- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे ‘विकसित भारत युवा संवाद – संविधान दिन विशेषांक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. मेरा युवा भारत, चंद्रपूर तथा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टोंगे सर होते, तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ॲड. वैशाली टोंगे प्रमुख व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच भारतीय संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपण्याची, संविधानाचा सन्मान करण्याची आणि संविधानातील तत्त्वांचे पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली.
संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी मेरा युवा भारत आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने Youth Icon म्हणून रुपेश पांडुरंग कुत्तरमारे उपस्थित होते. त्यांनी भारत सरकारच्या वतीने विकसित भारत युवा संवादासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित भारत 2047’ या विशेष PPT सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका, भारतीय संविधानाची मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, कौशल्य विकास, सामाजिक सहभाग, रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रनिर्मितीतील तरुणांचे योगदान या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी केवळ लाभार्थी न राहता सक्रिय भागीदार बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला मेरा युवा भारत कार्यालय, चंद्रपूरचे लेखापाल संजय राऊत, MTS मारुती बोभाटे, देवाभाऊ पाचभाई, यश आसुटकर, ढोके सर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण करणे आणि विकसित भारत 2047 च्या संकल्पनेशी तरुणांना जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.





