वरोरा :- KPCL बरांज प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या विविध समस्या आणि पुनर्वसन प्रक्रियेत सुरू असलेल्या कथित अनियमिततेचा पाढा प्रकल्पग्रस्तांनी थेट आमदारांसमोरच वाचला. ग्रामपंचायतीचे मूळ रेकॉर्ड डावलून केवळ झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांना पात्र-अपात्र ठरवण्याचा सुरू असलेला प्रकार आणि पुनर्वसनातील संथ कारभार यावरून आमदार करण देवतळे यांनी शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि KPCL कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलाच जाब विचारला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ तसेच KPCL कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत गाव नमुना ८ संदर्भात निर्माण झालेला संभ्रम, ग्रामपंचायतीकडून प्रमाणित कागदपत्रे न घेता करण्यात आलेली कार्यवाही, तसेच कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांना पात्र व अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी मांडल्या.
ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार एकूण १२६९ घरांची नोंद असताना प्रत्यक्ष घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. काही पात्र प्रकल्पग्रस्तांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असूनही अपात्र ठरविले जात असल्याचा, तर आवश्यक कागदपत्रे नसलेल्या काही व्यक्तींना पात्र ठरविले जात असल्याचा गंभीर आक्षेपही ग्रामस्थांनी नोंदविला.आमदार करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, कागदपत्रांची सत्यता, पात्र-अपात्र लाभार्थ्यांची निश्चिती आणि पुनर्वसन प्रक्रियेतील सर्व बाबींचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
प्रकल्पग्रस्त नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारींची योग्य पडताळणी व्हावी आणि शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने कार्यवाही व्हावी, याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले.या बैठकीमुळे बरांज KPCL प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांना प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली असून, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांबाबत पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





