28 November 2026News Website

वरोराच्या ६ कोटी ५१ लाखांच्या टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरमध्ये निकृष्ट काम? नगरसेविका सौ. लीना गयनेवार यांचा खणखणीत आक्षेप; बिल थांबवून चौकशीची धडक मागणी

वरोरा :- वरोरा नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल ६ कोटी ५१ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरच्या बांधकामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा खळबळजनक आरोप नगरसेविका सौ. लीना संजय गयनेवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदाराचे बिल रोखण्याची धडक मागणी केली आहे. या वेळी भारतीय जनता पार्टीचे गटनेते अक्षय भिवदरे, वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार, नगरसेवक प्रवीण चिमूरकर, स्वीकृत सदस्य शंभुनाथ वरगने तसेच नगरसेविका सौ. सीमा तडस, सौ. नलिनी आत्राम, सौ. नुपुर तेला, सौ. लता हिवरकर, सौ. मनिषा दानव आणि सौ. वर्षा पीसाळ हे निवेदन देताना उपस्थित होते.



इमारतीला मोठमोठ्या भेगा; नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सदर शॉपिंग सेंटरचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले असले तरी इमारतीला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक वापरासाठी सुरू होणाऱ्या या वास्तूत नागरिक व व्यापाऱ्यांचा मोठा राबता राहणार असल्याने, या त्रुटींमुळे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. जनतेच्या करातून उभ्या राहणाऱ्या कोट्यवधींच्या कामात अशा त्रुटी आढळणे अत्यंत धक्कादायक असल्याचा संताप निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

सौ. लीना गयनेवार यांच्या प्रमुख मागण्या

  • उच्चस्तरीय चौकशी :- टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरच्या संपूर्ण बांधकामाची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
  • सुरक्षितता अहवाल :- शॉपिंग सेंटरच्या इमारतीला पडलेल्या मोठ्या भेगांची तज्ज्ञ अभियंत्यांकडून तपासणी करून सुरक्षिततेचा अहवाल तयार करावा.
  • साहित्याचा दर्जा :- सिमेंट, लोखंड, वाळू व इतर बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यात यावी.
  • बिल रोखण्याची मागणी :- चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि दर्जा समाधानकारक असल्याचे सिद्ध होईपर्यंत प्रलंबित देयके व अंतिम बिल अदा करू नये.
  • अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई :- देखरेख करणाऱ्या संबंधित अभियंत्यांची व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच त्रुटी आढळल्यास ठेकेदाराकडून स्वखर्चाने दुरुस्ती करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • लेखी अहवाल :- संपूर्ण चौकशीचा अहवाल व केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात तक्रारदारास देण्यात यावी.

🙏दक्षता यंत्रणेकडे तक्रारीचा इशारा 🙏

नागरिकांच्या कररूपाने जमा झालेल्या निधीतून सुरू असलेल्या या कामात भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने तपासणी करून ठेकेदाराचे बिल थांबवणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकरणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित दक्षता यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरसेविका सौ. लीना संजय गयनेवार यांनी दिला आहे.

अभिषेक किशोर भागडे