वरोरा :- शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत असून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या, प्लास्टिकचे कप, डिस्पोजल ग्लास, चहाचे कप आणि इतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची विक्री व वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने प्लास्टिक वापरावर निर्बंध घातले असतानाही शहरातील दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याने नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे होत आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
प्लास्टिकच्या पिशव्या आणि डिस्पोजल कप वापरल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला, नाल्यांमध्ये आणि मोकळ्या जागेत फेकले जातात. त्यामुळे नाल्या तुंबण्याची समस्या निर्माण होण्यासह शहराच्या स्वच्छतेलाही बाधा पोहोचत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, प्लास्टिक बंदीच्या नियमांची जबाबदारी असलेल्या नगर परिषद प्रशासनाकडून नियमित तपासणी केली जाते का? प्रतिबंधित प्लास्टिक विकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होते का? की प्लास्टिक बंदीचा नियम केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला आहे.
वरोरा नगर परिषद प्रशासनाने आता केवळ स्वच्छतेच्या घोषणा न करता प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून तपासणी करावी, प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि पर्यायी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.प्लास्टिकमुक्त शहराचे स्वप्न दाखवायचे आणि प्रत्यक्षात प्लास्टिकचा बाजार सुरूच ठेवायचा, हा विरोधाभास थांबणार तरी कधी? आता तरी वरोरा नगर परिषद प्रशासन जागे होणार का, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
वरोरा शहरात प्लास्टिकच साठा प्रशासनाचे दुर्लक्ष कि ?





