चिमूर, दि. ५ नोव्हेंबर :- चिमूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची गंभीर बाब समोर येताच महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून थेट चिमूर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४ (A) तसेच बाल लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
एकीकडे महिलांना आणि मुलींना ‘लाडकी बहीण’ म्हणणारा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात महिलांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे चिमूरमधील घटनेवरून स्पष्ट होत आहे. भाजपचा चिमूर मंडळ अध्यक्ष तथा मौजा सातारा येथील आदर्श ग्रामपंचायतीचा माजी सरपंच गजानन धनराज गुडधे याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिच्या कुटुंबीयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यासाठीही ठिय्या आंदोलन करावे लागणे, ही पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी तो अद्याप फरार असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, पीडित मुलीला न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा धमकी येऊ नये, अशी मागणी शिवानी वडेट्टीवार यांनी केली.
भविष्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अशा अत्याचाराच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने या प्रकरणात कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस प्रशासन तसेच आमदार बंटी भांगडीया यांना देण्यात आले.
पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला अटक होऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. सत्तेचा किंवा राजकीय पदाचा वापर करून कोणालाही कायद्यापासून संरक्षण मिळता कामा नये, अस शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी विजू पाटील गावंडे, गजानन बुटके, जुनेद खान, प्रशांत डवले, माधवबापू बिरजे, शांताराम सेलवटकर, संदीप कावरे, रत्नाकर विटाळे, बब्बू खान आदी उपस्थित होते.





